आता “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम” या नावाने ओळखले जाणार अयोध्या विमानतळ


नवी दिल्ली – 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आल्यानंतर मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने आता अयोध्यात तयार होणाऱ्या विमानतळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्यातील या विमानतळाचे नाव आता “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ” असे असणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील हे विमानतळ पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. सध्या या विमानतळाचे काम सुरू असून हे काम पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी ट्विटरवरून दिली आहे. उत्तर प्रदेशचे सरकार श्रीराम लल्लाची नगरी अयोध्येला जगातील धार्मिक स्थळांमधील एक महत्त्वाचे, अग्रणी स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वरुपात विकसित केले जाणार आहे.