जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सहाव्या स्थानी अक्षय कुमार


बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार आपल्या चित्रपटांबरोबरच आपल्या सामाजिक कार्यांमुळे देखील चर्चेत असतो. आपल्या प्रत्येक कामात सदैव तत्पर असण्यासोबतच सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच अक्षय कुमारच्या यशाच्या मागचे खरे कारण आहे. त्यामुळेच बॉलीवूडमधील सगळ्यात महागड्या अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे. त्याचबरोबर आता जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या कलाकारांच्या यादीतही अक्षयने स्थान मिळवले आहे.

वर्षाला 48.5 मिलियन डॉलर (36२ कोटी रुपये) कमाई करून अक्षयने फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्याच्या टॉप 10 च्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे. त्याने या यादीमध्ये किंग खान शाहरुख आणि सलमान खानलाही मागे टाकले आहे. अक्षयच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत विक्रम मोडत सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट ठरला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त उत्पादनांच्या जाहिरातीच्या माध्यमातूनही अक्षयची कमाई होत असते.

आज जरी अक्षय यशाच्या शिखरावर असला तरी त्याचे राहणीमान साधे आहे. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. त्याचबरोबर सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्याच्या मनात वेगळे स्थान असल्यामुळेच आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्कराच्या शूर जवानांसाठी दान करतो. त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो.

अक्षयने आपल्या कामावरील प्रेम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. तो कोणतेही काम करताना त्याच उत्साहाने काम करतो.त्यामुळे आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही.