विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची शेंडी कापल्याप्रकरणी हेअर ड्रेसरविरोधात गुन्हा दाखल


देहराडून – उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील एका हेअर ड्रेसरला एका नेत्याची शेंडी कापणे चांगलेच महागात पडले आहे. या हेअर ड्रेसरविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याबरोबर त्याला तुरुंगात देखील जावे लागू शकते. या हेअर ड्रेसरने धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणूनबुजून संबंधित नेत्याची शेंडी कापल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या नेत्याची शेंडी केस कापत असताना हेअर ड्रेसरने कापली. हा प्रकार समोर येताच मोठा गोंधळ उडाला. तणाव वाढत असल्याचे पाहून हेअर ड्रेसर पसार झाला. दरम्यान, हे प्रकरण एवढे वाढले की अखेरीस पोलिसांना गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.

हल्द्वानी येथील लामाचौड परिसरात विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विशंभर दत्त पलडिया राहतात. सोमवारी आपल्या शेजारी असलेल्या हेअर ड्रेसरच्या दुकानात पलडिया हे केस कापण्यासाठी पोहोचले. या दरम्यान हेअर ड्रेसरने केस कापता कापता शेंडीवरही कैची चालवल्यामुळे गोंधळास सुरुवात झाली. पलडिया यांचे भाऊसुद्धा काही वेळापूर्वी तिथून केस कापून गेले होते. त्यांचीही शेंडी कापलेली आढळली. दरम्यान, या हेअर ड्रेसरने जाणूनबुजून आपली शेंडी कापली, असा आरोप पलडिया बंधूंनी केला आहे.

दरम्यान, संबंधित हेअर ड्रेसरविरोधात तणाव वाढल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कलम २९५ अ नुसार धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी प्रेस रिलीजसुद्धा पोलिसांनी जारी केली आहे. तसेच या प्रकरणी आरोपी असलेल्या हेअर ड्रेसरला अटकही करण्यात आली आहे.