सौरव गांगुलीने इतक्या वेळा केलीय करोना चाचणी

फोटो साभार न्यू इंडिअन एक्सप्रेस

बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली याने मंगळवारी करोना साथीमध्ये व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी गेल्या साडेचार महिन्यात तब्बल २२ वेळा करोना चाचणी करून घेतल्याचे सांगितले. सप्टेंबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबर सुरु होईपर्यंत सौरव युएई मध्ये आयपीएल आयोजनात व्यग्र होता. त्याने व्हर्च्युअल मिडिया कॉन्फरन्समध्ये लीविन्गार्ड एजीचा ब्रांड दूत म्हणून बोलताना वरील माहिती दिली.

सौरव म्हणाला, करोना पोझिटिव्ह लोक माझ्या आसपास होते त्यामुळे मला वारंवार चाचण्या कराव्या लागल्या. त्यामागे माझ्यामुळे आणि कोणाला संसर्ग होऊ नये असा हेतू होता. त्यामुळे मी २२ वेळा चाचणी केली पण एकदाही माझा रिपोर्ट पोझिटिव्ह आला नाही. मी माझ्या वृध्द आईवडिलांच्या सोबत राहतो. त्यातच मी दुबई प्रवास केला. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक होते.

यावेळी सौरवने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासंबंधी माहिती दिली. तो म्हणाला विलगीकरणाचा काळ पूर्ण झाला आहे आणि सर्व खेळाडू ठीक आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये करोना केसेस कमी आहेत तरीही १४ दिवस विलगीकरण केले गेले आहे. २७ नोव्हेंबर पासून दौऱ्याची सुरवात होत आहे. पुढची आयपीएल भारतात होईल अशी आशा त्याने व्यक्त केली. या आयपीएल मध्ये सुमारे ४०० लोक बायोबबल मध्ये होते आणि त्या काळात ३० ते ४० हजार करोना चाचण्या केल्या गेल्या अशीही माहिती त्याने दिली.