सुरेश रैनाचा आगळा वाढदिवस

टीम इंडियाचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत असून त्याचा हा वाढदिवस वेगळ्या कारणाने विशेष चर्चेत आला आहे. सुरेशने वाढदिवसानिमित्त उत्तर प्रदेश, जम्मू आणि एनसीआर मधील ३४ सरकारी शाळातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता गृह सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा या शाळेत शिकणाऱ्या १० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

रैनाच्या ग्रेसिया रैना फौंडेशनने अमिताभ शहा यांच्या युवा अनस्टॉपेबल या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. रैना या संदर्भात म्हणाला, विद्यार्थ्यांच्या योग्य वयात योग्य ती माहिती मिळाली पाहिजे. यासाटी आम्ही किशोर वयातील मुलीना प्रजनन, यौन स्वास्थ या संदर्भात माहिती देणार आहोत. प्रत्येक मुलाला चांगल्या शिक्षणाचा हक्क आहे त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांच्याही सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यात आणखी काही शाळा या कार्यक्रमात जोडण्याचा विचार आहे.

सुरेश रैना टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज होता. त्याने राईट एज प्रचाराचा उपक्रम पत्नीसह सुरु केला असून तरुण मुलीना त्यात वैज्ञानिक ज्ञान दिले जाणार आहे. याची सुरवात मुरादाबाद येथील चार शाळांपासून केली जात आहे. सुरेश स्वच्छ भारत अभियानशी संबंधित आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्याला उत्तर प्रदेश स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.