व्हॅसीन टुरिझमची सुरवात

फोटो साभार फ्री जर्नल प्रेस

संकटात संधी शोधावी असे नेहमी सांगितले जाते कारण अश्या संधीचे सोने करता येते. पर्यटन उद्योगाने अशी संकटात संधी साधण्याची तयारी सुरु केल्याचे दिसू लागले आहे. आजपर्यंत आपण मेडिकल टुरिझम बद्दल ऐकले आहे. संकट काळात डिझास्टर टुरिझमचे पेव सुद्धा फुटले होते. म्हणजे जेथे मोठे संकट येऊन गेले त्या जागी पर्यटकांना पर्यटनाला न्यायचे. या प्रकाराला सुद्धा लोकप्रियता लाभली होती.

आता त्यात व्हॅसिन टुरिझमची भर पडली आहे. मुंबईच्या जेम टूर्स आणि ट्रॅव्हल्सने करोना लसीकरण संधीचा फायदा घेऊन हे टुरिझम सुरु केले आहे. जेथे करोना लस उपलब्ध होणार आहे तेथे पर्यटकांना फिरा, प्रेक्षणीय स्थळे पहा आणि येताना करोना लस घेऊन या असे याचे स्वरूप आहे. म्हणजे प्रवास झाला, भटकंती झाली आणि लसीकरण पण झाले.

अर्थात हे पर्यटन सर्वसामान्य पर्यटकांना परवडणारे नाही तर हाय इन्कम ग्राहकच त्याचा विचार करू शकतील. सध्या या कंपनीने न्युयॉर्क टूर आयोजित केली आहे. अमेरिकेत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात फायझरची करोना लस मिळू लागणार आहे. त्यासाठी जेम्स टूर्स व्हीव्हीआयपी ग्राहकांना १ लाख ७५ हजार रुपयात मुंबई न्युयॉर्क आणि परत मुंबई प्रवास, तेथे ३ रात्री, चार दिवस मुक्काम आणि लसीकरण असे पॅकेज देत आहे. त्यासाठी अॅडव्हांस न देता नोंदणी करता येणार आहे.

फायझरची करोना लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला गेला आहे. या व्हॅसिन टूरच्या नोंदणीसाठी सध्या ग्राहकाने त्याचा मेल अॅड्रेस, फोन नंबर आणि पासपोर्ट नंबर द्यायचा आहे. या टूर साठी जागा मर्यादित असल्याचेही स्पष्ट केले गेले आहे.