मिरगपूर ठरले भारतातील पवित्र गाव

सहारनपुर मधील एका गावाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ,होली व्हेलेज किंवा पवित्र गाव’ असा खिताब जिंकून आपले नाव दर्ज केले आहे. १० हजार वस्तीच्या या गावात एकाही गावकरी दारू, मांस, सिगरेट, तंबाखू, विडीचे सेवन करत नाही. इतकेच नव्हे तर या गावात कांदा लसूण सुद्धा खाल्ला जात नाही. गावकरी हा सिद्ध बाबा फकीरदास यांचा आशीर्वाद मानतात.

मिळालेल्या माहितीनुसार ५०० वर्षापूर्वी या गावात फकीरदास नावाच्या सिद्ध पुरुषाने तपस्या केली होती. ते राजस्तानच्या पुष्कर मधून हरिद्वार येथे भ्रमणासाठी बाहेर पडले तेव्हा फिरत फिरत लांधोरा येथील प्राचीन शिवमंदिरात थांबले होते. त्यानंतर त्यांनी मिरगपूर येथील डोंगरावर सिद्ध कुटी बांधून तेथेच वास्तव्य केले होते. ‘गंठा लसन तमाखू जोई, मदिरा मांस ताजे शिष्य सोई, साढा धर्म रहेगा जबतक, मिरगपूर सुख पावेगा तबतक’ हा दोहा त्यांनी रचला होता आणि आजही या गावात या दोह्याचे पालन केले जाते.

दोन वर्षापूर्वी येथील तरुण मनोज पवार याने गावाने मिळविलेल्या या यशाची माहिती देशाला तसेच परदेशात व्हावी, गाव प्रसिद्धीस आणावे आणि पर्यटनस्थल म्हणून गावाचा विकास करावा यासाठी त्याच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रयत्न सुरु केले. त्यातून गावाला हा दर्जा मिळाला असून त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले आहे. यामुळे हे गाव देशाच्या पर्यटन नकाशात नोंदविणे सुलभ होणार आहे.