सोनू सूदने शाहरुख, अक्षय कुमारला पछाडले

फोटो साभार इगल्स वैन

करोना काळात लोकांच्या मदतीला धावून त्यांना आवश्यक मदत दिल्याबद्दल बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने अनेकांच्या मनात मानाचे स्थान मिळविल्याचे आपल्याला माहिती आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आजही सोनू जे कुणी मदतीची हाक देतात त्यांना मदत देतो आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रीय असल्यामुळे सोनू सतत चर्चेत आहेच. त्यातही त्याने आता नवीन विक्रम केला असून ट्विटर वरील लोकप्रिय व्यक्तीमध्ये तो चार नंबरवर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने बॉलीवूड कलाकार शाहरुख खान आणि अक्षय कुमार याना मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे सोनूला याबाबत काहीच माहिती नव्हती त्यामुळे त्याला जेव्हा त्याच्या या विक्रमाबद्दल समजले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. राजकारणांतील नेते, उद्योजक, सेलेब्रिटी, अश्या विविध कॅटेगरी साठी ट्वीटेक्ट नावाची अॅनालेटीक फर्म निरीक्षणे नोंदवीत असते. त्या ट्विटर एंगेजमेंट रिपोर्ट नुसार ऑक्टोबर मध्येच सोनू या यादीत चार नंबरवर आला आहे. सर्व कॅटेगरीत पहिल्या नंबरवर पंतप्रधान मोदी आहेत, दोन नंबरवर राहुल गांधी आहेत, तीन नंबरवर विराट कोहली आहे आणि चार नंबर सोनूचा आहे. सोनूचे ट्विटर एंगेजमेंटस मध्ये २४,३६,६०१ फॉलोअर आहेत. शाहरुखचे ७.३ लाख तर अक्षयकुमारचे ६.७२ लाख फॉलोअर आहेत.

सोनूला ही माहिती कळल्यावर तो म्हणाला, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म मुळे ज्यांना मदतीची गरज होती अश्या लोकांशी मी जोडला गेलो. सोशल मीडियाचा याच कारणासाठी वापर व्हावा असे मला वाटते. यामुळे सर्वसामान्य माणूस आणि सेलेब्रिटी यांच्यातील दरी कमी होण्यास हातभार लागला पाहिजे. सोनुला मसीहा म्हणजे देवदूत असे म्हटले जात आहे. त्यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सोनू ‘आय अॅम नॉट मसीहा’ या नावाचे आत्मचरित्र लिहीत आहे.