लँडलाईनवरून मोबाईल कॉलसाठी नवे नियम १ जानेवारी पासून लागू

नवीन वर्षात १ जानेवारी पासून लँडलाईन वरून मोबाईल नंबरवर फोन करण्यासाठी नवे नियम लागू होत आहेत. त्यानुसार असा कॉल करताना मूळ नंबरच्या अगोदर शून्य लावावे लागणार आहे. यामुळे टेलीकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांना जास्तीचे नंबर ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी टेलिकॉम विभागाने एक पत्रक जारी केले आहे. ट्रायने नवीन नंबर संदर्भात मांडलेला प्रस्ताव मंजूर केला गेला असल्याचे व नवीन नियम १ जानेवारी पासून लागू करण्यास परवानगी दिल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सध्या आपल्या क्षेत्राबाहेर लँडलाईनवरून मोबाईल वर कॉल करण्यासाठी नंबरच्या अगोदर शून्य लावावे लागते. मात्र आता कुठेही कॉल करण्यासाठी शून्य लावावे लागेल. दूरसंचार कंपन्यांना ही नवी व्यवस्था लागू करण्यासाठी जानेवारी पर्यंत वेळ दिली गेली होती. डायल पद्धत बदलल्याने दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवेसाठी २५४.४ कोटी जास्तीचे नंबर तयार करायची सुविधा मिळाली आहे. यापुढे जाऊन नवीन नंबर सुद्धा कंपन्या जारी करू शकतील. भविष्यातील गरज पूर्ण करणे त्यामुळे शक्य होणार आहे.

भविष्यात दूरसंचार कंपन्या ११ आकडी मोबाईल नंबर जारी करतील. मोबाईल ग्राहक संख्या वाढीचा वेग प्रचंड असल्याने १० आकडी नंबर कमी पडत आहेत. नंबर अगोदर शून्य लागल्याने पुढचा मार्ग सोपा बनणार आहे असेही सांगितले जात आहे.