ओवेसी बंधूच्या मुखी नेहमीच जिन्नांची भाषा; भाजप नेत्याने साधला निशाणा


हैदराबाद – ओवेसी बंधूंवर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. एआयएमआयएम विरुद्ध भाजपा अशी लढत ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहायला मिळत आहे. या निवडणुकींसाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. महापालिका निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या सूर्या यांनी निवडणुकीच्या आधीच एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि त्यांच्या भावावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन आणि अकबरुद्दीन हे विकासाबद्दल बोलत आहेत हे खूपच हास्यास्पद असल्याचे सूर्या यांनी म्हटले आहे.

कधीच जुन्या हैदराबादचा विकास ओवेसी बंधू करणार नाही. केवळ रोहिंग्या मुस्लिमांना ते भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारे प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणारे मत असेल. विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी असदुद्दीन ओवेसी हे करतात. मोहम्मद अली जिन्नाही याच गोष्टी करायचे, अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वीच असदुद्दीन ओवेसींनी भाजपवर टीका करताना भाजपकडून या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला होता. जेव्हा हैदराबादमध्ये पूरजन्य परिस्थिती होती तेव्हा केंद्राने काय केले असा सवालही ओवेसी यांनी केंद्र सरकारला विचारला होता. भाजप नेत्यांना तुम्ही रात्री झोपेतून उठवले आणि काही विचारले तर ते लोक ओवेसी गद्दार, दहशतवादी आणि पाकिस्तानी आहे, असेच सांगतील. पण भाजपने हे सांगितले पाहिजे की तेलंगण खास करुन हैदराबादला मागील वर्षी त्यांनी कोणती आर्थिक मदत केली? जेव्हा हैदराबादमध्ये पूर आला तेव्हा मोदी सरकारने काय मदत केली? त्यावेळी त्यांनी काहीच मदत केली नव्हती म्हणून आता हा धार्मिक मुद्दा निर्माण केला जात असल्याचा टोलाही ओवेसींनी लगावला होता.