देशातील ‘या’ १ कोटी लोकांना सर्वात आधी दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस


नवी दिल्ली – पुढील वर्षाच्या सुरूवातीला देशात कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरत असलेली लस उपलब्ध होऊ शकते. एक कोटी फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी वर्गाची यादी प्राथमिकतेच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच सगळ्यात आधी या लोकांना लस दिली जाणार आहे. या संदर्भात द इंडियन एक्‍सप्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांच्या गटाने लसीचे वितरण, लसीकरण या व्यवस्थेसाठी एक कोटी लोकांची ड्राफ्ट यादी तयार केली आहे. यासाठी विविध राज्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ९२ टक्के सरकारी रुग्णालयातील माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमधून ५६ टक्के माहिती पुरवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या एका गटाने दिलेल्या माहितीनुसार लस आता एडव्हांस स्टेजमध्ये आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून फ्रंटलाईन कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची वेगवेगळ्या गटात विभागणी केली जात आहे.

अॅलोपेथिक डॉक्टर्स, आयुष डॉक्टरर्स, आशा वर्कर्स, एएनएम यांचा यात समावेश आहे. लस ही संपूर्ण १ कोटी लोकांना दिली जाणार आहे. त्यांना त्यात प्राथमिकता दिली जाणार आहे. लसीकरण कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी मेडिसिन आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा आणि फॅकल्टी मेंबर्सचा समावेश असेल.

४० ते ५० कोटी डोस जुलै २०२१ पर्यंत मिळू शकतात. त्यानंतर २०- २५ कोटी भारतीयांचे लसीकरण केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ऑक्टोबरमध्ये दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमणाचा धोका ज्या लोकांना जास्त आहे. त्यांना सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे. संभाव्य लसीकरण पुढच्या वर्षाच्या जुलैपर्यंत केले जाईल.