सरनाईकांविरोधातील कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला असून तुम्ही सुरुवात केली, आम्ही शेवट करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्याचबरोबर कोणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा, असे जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करु नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले आहेत.

आमचे हे सरकार, आमदार आणि नेते हे काही झाले तरी कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढा देत राहू. पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष हे सरकार कायम राहील. जे सरकारवर एजन्सीचा वापर करुन दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर तुमचे सरकार पुढील २५ वर्ष येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. जर तुम्ही आज सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला चांगलेच माहिती असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

ईडीने आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर कार्यालय थाटले, तरी आम्ही घाबरत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करु नये, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. ते ज्यांचे आदेश पाळत आहेत त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे.

पण केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. कितीही नोटीसी तुम्ही पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे सादर करा, पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

भाजप कार्यालयात ईडीने शाखा उघडली असावी. पण कोणाच्या बापाला आम्ही भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवता. हिंमत असेल तर घरी या. प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे, तो पुरुषार्थ नाही. सरळ लढाई भाजपने लढली पाहिजे. ईडीचा, केंद्रीय सत्तेचा शिखंडीसारखा वापर करु नये, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.