दानवेंच्या सत्तास्थापनेच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले…


मुंबई – आगामी दोन तीन महिन्यात राज्यात भाजपचे सरकार असेल, असा दावा केंद्रीय राज्य मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीचे सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याचे म्हटलं आहे. तसेच पाच वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले की, हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. सध्या एक वर्ष पूर्ण झाले असून पुढील चार वर्ष देखील पूर्ण करेल. विरोधी पक्षातील नेते निराश झाल्यानेच तसंच सर्व प्रयत्न फसल्याने असे वक्तव्य करत आहेत. या सरकारसोबत महाराष्ट्रातील जनता आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात असून जे तीन दिवसांचे सरकार केले होते त्याची आज पुण्यतिथी असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तीन दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी असून आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. यांची चार वर्ष स्वप्न पाहण्यातच निघून जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य काम करत आहे. तीन पक्षांचे सरकार असूनही भक्कम आहे. देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार महाविकास आघाडीचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांसंबंधी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, वेगळी गुप्तचर यंत्रणा चंद्रकांत पाटलांनी सुरु केली असेल तर त्याचा फायदा केंद्र सरकारने करुन घ्यावा. राजकारणात एवढी मजबूत गुप्तचर यंत्रणा मी पाहिली नसल्याचे म्हणत टोलाही लगावला आहे. शरद पवारांना काय करायचे ते करतील. महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते असल्याचेही ते म्हणाले.