रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा; महाराष्ट्रात आगामी दोन महिन्यात येणार भाजपची सत्ता


परभणी : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा खळबळजनक दावा केला आहे. राजकीय वर्तुळात दानवे यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. परभणीत औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

दानवे यांनी पुढे म्हटले की, सरकारमध्ये जे तिघे एकत्र बसले आहेत, त्यांचा एकमेकांवर विश्वासच नाही. आम्ही फक्त वाट बघून आहोत. सत्तेसाठी लागणारी सर्व जुळवाजुळव झाली असून येत्या 2 महिन्यात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. त्याचबरोबर आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही, असा विचार कार्यकर्त्यांनी करू नये. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, राज्यात येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात आपले सरकार स्थापन झालेले असेल आणि तुम्ही सगळे माझे म्हणणे लक्षात ठेवा, असे म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.

तसेच राज्यात सरकार कसे स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. पण सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू. सध्या फक्त होणाऱ्या निवडणुका पार पडण्याची आम्ही वाट बघत असल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन काम करायचे की, महाराष्ट्रात आपण सरकार स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.