बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या पहिल्याच सभेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा


बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. सभेसाठी पंकजा मुंडे आल्यामुळे मोठी गर्दी झाली असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी पंकजा मुंडे या बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडेंची बीडमध्ये पदवीधर निवडणुकांसाठी पहिलीच सभा असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याची माहिती समोर येत आहे. पंकजा मुंडे या कोरोनाच्या या जीवघेण्या संकटानंतर पहिल्यांदाच सभेमध्ये बोलणार असल्यामुळे बीडच्या सभेतील भाषणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. सत्ताधारी शिवसेनेवर यावेळी फडणवीसांनी टीका केली होती. मराठवाडा-विदर्भ ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला होता.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर निवडणुकीत कोरोनाबाधितही मतदान करणार आहेत. आरोग्य विभागाकडून मतदानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची सायंकाळी चार ते पाच या वेळेत सोय असणार आहे. आरोग्य विभाग रुग्णाला मतदान केंद्रावर नेवून मतदान करण्यात येईल.