२७ तारखेला सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार नरेंद्र मोदी ?


पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले. पण आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्याची शक्यता निर्माण झाली असून तसे संकेतच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. सध्या सर्वांचे लक्ष पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे असून जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील, असे अदर पूनावाला यांनी सांगितले आहे. यादरम्यान पुणे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे.

कोरोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस तयार करण्यात येत आहे. २७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९८ देशांचे राजदूत भेट देण्याची शक्यता आहे. प्रशासनाची याबाबत बैठक झाली आहे. सौरभ राव यांची भेट घेत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचे कळत आहे.

जानेवारी अखेरपर्यंत कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे १० कोटी डोस तयार असतील, अशी माहिती एनडीटीव्हीशी बोलताना सिरम इन्सिट्यूटचे अदर पूनावाला यांनी दिली आहे. काही ठराविक परिस्थितींमध्ये कोव्हिशिल्ड लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्याच्या घडीला कोरोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोरोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा अदर पूनावाला यांनी यावेळी केला आहे. मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पण सरकार प्रत्येक डोससाठी २५० रुपये खर्च करत ९० टक्के पुरवठा खरेदी करणार असल्याची माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.