जो बायडेन यांनी केली आपल्या सहकाऱ्यांची निवड


न्यूयॉर्क: अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील प्रमुख सहकाऱ्यांची निवड केली आहे. त्यांनी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी प्रथमच एका लॅटिन व्यक्तीवर सोपविली आहे तर देशांतर्गत गुप्तचर विभागाच्या संचालकपदी प्रथमच महिला विराजमान होणार आहे.

बायडेन यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्यासाठी दीर्घकाळ परराष्ट्र धोरण सल्लागार म्हणून काम केलेले अँटनी ब्लिंकेन यांची निवड केली आहे. अमेरिकेचे मुख्य राजदूत जॉन केरी यांच्याकडे हवामान विभागाची जबाबदारी असणार आहे. क्युबा येथे जन्मलेले ज्येष्ठ वकील अलेजांड्रो मायोर्कस यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. ही जबाबदारी स्वीकारणारे ते पहिले लॅटिन व्यक्ती असणार आहेत.

‘सीआयए’ या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या माजी उपसंचालक आर्विल हेन्स यांच्यावर अंतर्गत गुप्तचर विभागाची जबाबदारी असणार आहे. ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत. संयुक्त राष्टातील अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांना जबाबदारी दिली जाणार आहे. या पदाला मंत्रिपदाचा दर्जा आहे. बायडेन उपाध्यक्ष असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे जेक सालीवन यांची ‘व्हाईट हाऊस’च्या सुरक्षा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.

हे सर्वजण सन २००९ ते १७ या ओबामा- बिडेन प्रशासनात सहभागी होते. सर्वजण आपापल्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आहेत.