महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रथमच अटकेची कारवाई


मुंबई- राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण-ब, वस्तू व सेवाकर विभाग, माझगांव, मुंबई या कार्यालयामार्फत केलेल्या तपासानुसार दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल यांनी स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे एकूण ४ कंपन्यांची महाराष्ट्र/केंद्रीय वस्तू व सेवाकर कायदा २०१७ कायद्याखाली नोंदणी केली असून इतर २६ कंपन्यांची विविध लोकांच्या नावे महाराष्ट्र /केंद्रीय वस्तू व सेवाकर कायद्याखाली नोंदणी करुन घेतली आहे. या ३० कंपन्यांच्या आस्थापनांच्या नावे सदर व्यक्ती दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल यांनी २ हजार १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बोगस विक्री बिले, कोणत्याही वस्तू वा सेवा यांचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष पुरवठा न करता निर्गमित केली आहेत. व त्या माध्यमातून १८५ कोटी रुपयांचा बोगस Input Tax Credit इतर अनेक कंपन्यांना उपलब्ध करुन दिला असून त्याद्वारे शासनाच्या महसुलाचे तितक्या रकमेचे नुकसान केले आहे. असे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम १३२ (१) (ब) व (क) अंतर्गत गुन्हा असून कलम १३२ (१)(i) नुसार शिक्षेस पात्र असून कलम १३२ (५) नुसार हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र स्वरुपाचा आहे.

दिलीपकुमार रामगोपाल तिब्रेवाल यांचा संचालक M/s Augst Overseas Private Limited, तसेच संचालक M/s Aaryanaman Global Pvt.Ltd,व Proprietor M/s Shagun Fibres, आणि इतर 27 GSTIN नोंदणीकृत कंपन्यांचे प्रवर्तक (Operator) या नात्याने २३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मालाड (प), मुंबई येथील निवासस्थानामधून सकाळी साडेसात वाजता पंच व पोलीसांच्या उपस्थितीत राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-ब, मुंबई यांच्या कार्यालयाकडून अटक करण्यात आली असून ही कार्यवाही महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम ६९ नुसार करण्यात आली आहे.

तिब्रेवाल यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी Esplanade, मुंबई यांच्या न्यायालयाकडून ५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कार्यवाही राज्य कर आयुक्त संजीव कुमार, सह आयुक्त (अन्वेषण) संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सत्यजीत भांड, एस.पी. सरावणे व सहायक राज्यकर आयुक्त आशिष कापडणे यांच्या पथकाने केली आहे.