कोरोना लसीकरणासंदर्भात’टास्क फोर्स’ची स्थापना


मुंबई: महाराष्ट्रात करोना प्रतिबंधक लसीकरण प्रकिया निश्चित करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत बोलताना दिली. लसीकरणासंदर्भात त्यांनी ही लास बनविणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याशीही संवाद साधला.

‘सीरम इन्स्टिट्यूट’ येथे करोनाप्रतिबंधक लसीचे उत्पादन केले जात आहे. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्येकी २ म्हणजेच २५ कोटी लसींची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात संसर्गाचा सर्वाधिक डॉक्टर्स, परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या लसीकरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नियुक्त करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, लस उपलब्ध करण्याचे मार्ग, लसीकरणाची पद्धत, लसीची साठवण व वाहतूक, लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उभारणी याबाबतचा अभ्यास आणि सूचना हा ‘टास्क फोर्स’ करणार आहे.