ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला घेतले ताब्यात


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी छापेमारी केल्यानंतर ईडीने त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेतले आहे. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी दाखल झाले असून छापेमारी सुरु केली आहे.

ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. ईडीचे पथक प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी दाखल झाले होते. ईडीचे पथक प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी देखील दाखल झाल्यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

ईडीचे पथक विहंग सरनाईक यांना घेऊन निघून गेले आहे. चौकशीसाठी त्यांना मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. ही कारवाई त्याच पार्श्वभूमीवर केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले की, राजकीय सुडापोटी ईडीची ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून कोणतीही नोटीस मला देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.