ब्लिंकेन यांची निवड भारताच्या पथ्यावर: चीन, पाकिस्तानला इशारा


नवी दिल्ली: अमेरिकेच्या परराष्ट्रपदी झालेली अँटोनी ब्लिंकेन यांची निवड भारताच्या पथ्यावर पडणारी असून भारताविरोधात सातत्याने कुरघोड्या करणाऱ्या चीन आणि पाकिस्तानसाठी मात्र ही निवड म्हणजे एक इशाराच ठरणार आहे.

ब्लिंकेन हे ओबामा प्रशासनात हिलरी क्लिंटन यांच्या परराष्ट्र विभागात धोरण निश्चिती विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्याचा प्राधान्य दिल्याचे दिसून येते. तसेच चीनचे दादागिरीचे धोरण आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला दिला जाणारा पाठींबा याला त्यांनी विरोध केल्याचेही आढळून येते. त्यांनी नुकत्याच केलेल्या काही विधानांवरून त्यांच्या धोरणाची दिशा कळून येऊ शकते.

हडसन इन्स्टिट्यूट येथे एका कार्यक्रमात बोलताना ब्लिंकेन म्हणाले, भारताबरोबर राजनैतिक संबंध अधिकाधिक दृढ करण्याला आपले प्राधान्य असणार आहे. हिंद-प्रशांत भूभागाच्या भविष्यासाठी भारत आणि अमेरिकेचे सहकार्य आणि सौहार्द महत्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही लोकशाही देशांमधील दृढ आणि स्थिर संबंध जगासमोरील मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक आहेत.

ओबामा प्रशासनाच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रातील वाढत्या भागीदारी आणि व्यापाराचा उल्लेख ब्लिंकेन यांनी अनेकदा केला आहे. ते म्हणतात, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक सहकार्याच्या सातत्याने वाढ होत गेली आहे. भारताची संरक्षणसिद्धता वृद्धिंगत करण्याला अमेरिकेने नेहेमीच प्राधान्य दिले आहे. त्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार याला प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय आणि अमेरिकन कंपन्यांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठे काम केले आहे. परिणामी भारत आणि अमेरिका हे संरक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण भागीदार बनले आहेत.

भारताचा संयुक्त राष्ट्र संघाच्या कामकाजात महत्वपूर्ण सहभाग असावा. त्यामुळे भारताच्या सुरक्षा परिषदेतील स्थानाच्या दाव्याला बळकटी मिळेल. त्यासाठी बिडेन प्रशासन नेहेमीच सहकार्य देईल, असा निर्वाळाही त्यांनी दि. १५ ऑगस्ट रोजी भारत- अमेरिका संबंधांवर पार पडलेल्या परिसंवादात बोलताना दिला आहे.

चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी भारत हा अमेरिकेचा सर्वात प्रभावी साथीदार असेल, असा विश्वास ब्लिंकेन यांना आहे आणि त्यांनी तो अनेकदा व्यक्त केला आहे. ते म्हणतात, चीनचा आक्रमक विस्तारवाद हे अमेरिकेसमोरच नव्हे तर संपूर्णाजगासमोरील मोठे आव्हान आहे. भारत आणि चीन यामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने केलेली आगळीक हे त्याचे निदर्शक आहे. अर्थशक्तीचा वापर करूनही चीन अनेक देशांवर दबाव निर्माण करीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बिडेन हे लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतासारख्या साथीदारांच्या सहकार्याने निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास ब्लिंकेन यांनी व्यक्त केला आहे.

दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा भागीदार असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या सर्व विधानांवरून बिडेन प्रशासनाच्या कार्यकाळात ब्लिंकेन परराष्ट्रमंत्री पदावर कार्यरत असताना भारत आणि अमेरिका संबधं वृद्धी होण्याची आशा अधोरेखित होत आहे.