फडणवीसांचा आम्ही कधीच ‘टरबुज्या’ असा उल्लेख केलेला नाही – जयंत पाटील


पुणे – राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने कधीही देवेंद्र फडणवीस यांचा टरबुज्या असा उल्लेख केलेला नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग त्यांनी मानून घेऊ नये, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. आज पुण्यात पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील एका मेळाव्यात शरद पवारांवर टीका केली होती. राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. पण राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचे दिसून आले. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते असल्याचेही पाटील म्हणाले होते.

त्यानंतर त्यावर सारवासारव करण्याचाही चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केला होता. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल कायम चांगले बोलत आलो आहे.आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी मी काही गोष्टी बोललो. शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालते. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालते का?,’ असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या त्या वक्तव्याला आज जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

जयंत पाटील यांनी कोरोनाच्या परिस्थितीबद्दलही भाष्य केले. लॉकडाऊन हा कोणत्याही परिस्थितीला सुयोग्य पर्याय नाही. पण सध्या सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करण्याची गरज असल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

६७ हजार कोटींची राज्य सरकारवर थकबाकी असूनही या अवस्थेत सरकार वीजेसंदर्भातील दुरुस्तीची कामे करणार आहे. आपली व्यवस्था टिकणे महत्वाचे आहे. आम्ही वीज बिलाबाबत मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. पण मागील सरकारने काम केले असते, तर ही वेळ आली नसती. आम्ही नक्कीच वीज बिलाबाबत निश्चित मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणतात. पण बरे झाले निवडणुकीच्या आधीच सत्तांतर होईल, असे नाही म्हटले. पण ते काहीही म्हणाले तरी राज्याला आता भाजप सरकारची गरज राहिली नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.