सीरमने दिली गोड बातमी; कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड ९० टक्के प्रभावी


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येची १ कोटींच्या दिशेने वाटचाल सुरु असून देशातील काही राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित वाढू लागले असल्यामुळे चिंता वाढत आहे. यादरम्यान भारताला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतात ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून काम करत असलेल्या सीरम इंस्टिट्युटने एस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड ही लस कोरोनापासून बचाव करण्यात ९० टक्के प्रभावी ठरल्याचे सांगितले आहे.

एक पत्रक प्रसिद्ध करून ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने सांगितले की, ही लस युनायटेड किंग्डम आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये प्रभावी दिसून आली आहे. ही अर्धी लस दिल्यावर ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी दिसून आली आहे. त्यानंतर पूर्ण डोस दिल्यानंतर ६२ टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला. एका महिन्यानंतर पुन्हा दोन पूर्ण डोस दिल्यावर ७० टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला. पुण्यामधील सीरम इंन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून ही लस तयार करण्यात येत आहे. ही लस भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने उपलब्ध होणार आहे.

पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये देशातील फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. तर भारतात तयार होत असलेली भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला देखील फेब्रुवारीपर्यंत आपातकालीन वापरासाठी मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे.