बिहारमधील नवनिर्वाचित एमआयएम आमदाराचा शपथग्रहण करताना ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास नकार


पाटना – आजपासून बिहारमध्ये नव्या विधानसभेचे सत्र सुरू झाले असून मुख्यमंत्री नितीश कुमार व राजद नेते तेजस्वी यादव यांच्यातील निवडणूक निकालपासून पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. सर्व नव्या आमदारांनी सत्राच्या पहिल्यात दिवशी शपथ घेतली. पण या दरम्यान, शपथग्रहण पत्रातील हिंदुस्थान शब्दावर आक्षेप घेत, त्या जागी भारत हा शब्द एमआयएम आमदार अख्तरूल इमान यांनी वापरला.

एमआयएमचे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथपत्रात लिहिलेला ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास नकार दिला व त्या जागी ‘भारत’ या शब्दाचा वापर केला. जेव्हा शपथ घेण्यासाठी अख्तरूल इमान यांचे नाव पुकारण्यात आले तेव्हा, त्यांनी उभे राहून ‘हिंदुस्थान’ शब्दावर आक्षेप घेतला. उर्दू भाषेत त्यांना शपथ घ्यायची होती. उर्दूमध्ये भारतच्या जागी हिंदुस्थान शब्दाच्या वापरावर त्यांनी आक्षेप नोंदवत, हिंदुस्थान शब्दाच्या जागी भारत हा शब्द मी उच्चारत असल्याचे प्रोटेम स्पीकर मांझी यांना म्हटले.

अख्तरूल इमान यांनी म्हटले की, भारताच्या राज्यघटनेची शपथ हिंदी भाषेत घेतली जाते. मैथिलीमध्ये देखील हिंदुस्थानच्या जागी भारत शब्द वापरला जातो. पण उर्दूमध्ये शपथ घेण्यासाठी जे पत्र देण्यात आलेले आहे, त्यात भारताच्या जागी हिंदुस्थान शब्दाचा वापर केला गेला आहे. तसेच, भारताच्या राज्यघटनेची मी शपथ घेऊ इच्छित असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी म्हटले.