२१३ कोटी खर्च करुन दिल्लीत खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या तीन टॉवर्सचे मोदींनी केले उद्घाटन


नवी दिल्ली – खासदारांसाठी उभारण्यात आलेल्या बहुमजली निवासस्थानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उद्घाटन केले. हा उद्घाटन सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. दिल्लीतील डॉक्टर बीडी मार्गावर ही सर्व बहुमजली घरे आहेत. मोदींनी या उद्घाटन समारंभामध्ये बोलताना सर्व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले. तसेच सर्वांना नवीन घरांसाठी शुभेच्छा दिल्या. आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये अनेक इमारतींचे बांधकाम सुरु झाले आणि नियोजित वेळेआधी पूर्ण देखील झाले. ज्या आंबेडकर नॅशनल मेमोरियलची चर्चा अटलजींच्या काळात सुरु झाली होती त्याचे बांधकामही याच सरकारच्या कालावधीमध्ये करण्यात आले. अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या अनेक योजना आमच्या सरकारने मार्गी लावल्याचेही मोदींनी यावेळी खासदारांना सांगितले.

अनेक दशकांपासून असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे निराकरण होत नाही तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने होते. देशामध्ये वॉर मेमोरियल, पोलीस मेमोरियलसारख्या अनेक योजना होत्या ज्या मागील अनेक वर्षांपासून अडकून पडल्या होत्या त्या सर्व योजना आमच्या सरकारने पूर्ण केल्याचेही मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

लोकप्रितनिधी म्हणून काम करताना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा खासदारांना या नवीन घरांमध्ये देण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली. मागील बऱ्याच काळापासून दिल्लीमध्ये खासदारांना राहण्यासाठी निवाऱ्याची सोय हा चर्चेचा मुद्दा होता. खासदारांना दिल्लीत गेल्यावर अनेकदा हॉटेलमध्ये रहावे लागते, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. अशा दशकांपासूनच्या समस्या टाळल्याने नाही तर सोडवल्याने सुटतात, असे सांगत मोदींनी या घरांची योजना पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

संसदेमध्ये सदनाचा वेळ वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे लोकसभेचे सभापती असणारे ओम बिर्ला हे प्रयत्नशील असतात, तशाच प्रकारे ही घरे उभारताना त्यांनी पैशांची बचत केली. ही घरे उभारताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे. या घरांच्या बांधकामाचे काम कोरोना कालावधीमध्येही सुरु होते आणि ते विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याचे सांगत मोदींनी या योजनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्याकडे क्रिया सिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे, असे म्हणतात. म्हणजेच कर्माची सिद्धी आपल्या सत्यावर संकल्पावर आणि नियतीवर अवलंबून असते. आपल्याकडे साधन आहे आणि दृढ संकल्पही असल्याचे मोदींनी म्हटले.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार गंगा, यमुना आणि सरस्वती नावाने बीडी मार्गावर तीन मोठे टॉवर बांधण्यात आले आहेत. एकूण ७६ फ्लॅट यामध्ये आहेत. ८० वर्ष जुने आठ बंगले या इमारतींच्या बांधकामासाठी पाडण्यात आले. या बंगल्यांच्या जागीच हे टॉवर उभारण्यात आले आहेत. एकूण २१३ कोटींचा या प्रकल्पासाठी खर्च आला आहे. कोरोनाच्या साथीनंतरही एकूण अपेक्षित खर्चापेक्षा १४ टक्के कमी खर्चात हा प्रकल्प उभारण्यात आला.

खासदारांना देण्यात आलेली घरे ही फोर बीएचके कॉन्फिगरेशनची आहेत. खासदारांना घरांबरोबरच त्यांच्या कार्यालयासाठी वेगली जागा देण्यात आली आहे. या प्रत्येक घरामध्ये दोन बाल्कनी, चार वॉशरुम आणि एक देवघर देण्यात आले आहे. यामध्ये मॉड्युलर किचनही देण्यात आले आहे. तसेच स्टाफसाठी वेगळे स्टाफ क्वॉर्टर्सही उभारण्यात आले आहेत.