लस येत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवा – कपिल पाटील


मुंबई – एकीकडे कोरोनाचे संकट अजून वाढत असतानाच राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर खबरदारी घेऊन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पण शाळा उघडण्याची घाई सरकारने करू नये. त्याचबरोबर या वर्षासाठी दहावी-बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलावा लागेल, त्याचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार कपिल पाटील यांनी पत्र लिहिले असून त्या पत्रात त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास बिलकुल तयार नाहीत. पालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. राज्यातील ५०० हून अधिक शिक्षक RTPCR टेस्टमध्ये कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची शक्यता असलेल्या सर्व भागातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवणे यावेळेस उचित ठरेल. तसेच शिक्षकांनाही ५० टक्के उपस्थितीची सक्ती रद्द करून त्यांना वर्क फ्रॉम होमची ऑनलाईन शिक्षणासाठी मूभा देण्यात यावी, असे म्हटले आहे.

पहिल्या सत्रात माध्यमिक विभागात ऑनलाईन शिक्षण बऱ्यापैकी झाले असले, तरी प्राथमिक विभागात ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. किमान उर्वरित सत्रासाठी कृती पुस्तिका, वर्क बुक, वर्क शीट, ऍक्टिव्हिस्ट बुक छापून हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्यास ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल.

या वर्षासाठी दहावी, बारावीच्या परीक्षांचा पॅटर्नही बदलावा लागेल. लवकर त्याचाही निर्णय व्हावा. लस येत नाही तोपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये. तसेच लस आल्यानंतर आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्या सोबतच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि अंगणवाडी सेविका यांना प्राधान्याने लस मोफत उपलब्ध करून द्यावी. यात आपण तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असून कृपया लवकरात लवकर याबाबतचे आदेश द्यावेत, अशी विनंती कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे.

Loading RSS Feed