सात वर्षाच्या बंदीनंतर श्रीसंत पुन्हा क्रिकेट मैदानात

फोटो साभार इनसाईड स्पोर्ट्स

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत सात वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा क्रिकेट मैदानात उतरत आहे. केरळ क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रेसिडेंट टी २० कप स्पर्धेतून तो पुनरागमन करत आहे. २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतला दोषी ठरविले गेले होते आणि त्याच्यावर सात वर्षाची बंदी घातली गेली होती. या वर्षी सप्टेंबर मध्ये त्याची बंदी मुदत संपली आहे.

पुढच्या महिन्यात केरळच्या अल्पुझा येथे होणाऱ्या प्रेसिडेंट टी २० लीग मध्ये श्रीसंत खेळणार असल्याचे केरळ क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले आहे. झारखंड, आंध्रप्रदेशच्या पावलावर पाउल टाकून केरळने स्थानिक पातळीवर टी २० लीग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना यासाठी सरकारी मंजुरीची प्रतीक्षा आहे.

श्रीसंत बंदीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक होता. २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या टी २० वर्ल्ड कप टीमचा तो हिस्सा होता तसेच वन डे वर्ल्ड कपचाही तो हिस्सा होता. आत्तापर्यंत त्याने ६० टी २० मध्ये ५० विकेट घेतल्या आहेत. आयपीएल मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स कडून खेळला आहे.