रिझर्व बँक बनली सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेली केंद्रीय बँक

फोटो साभार युवर स्टोरी

भारतीय रिझर्व बँकेने कमी कालावधीत जगातील प्रमुख केंद्रीय बँकांना मागे टाकत सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेली केंद्रीय बँक बनण्याची कामगिरी बजावली आहे. रिझर्व बँकेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या १० लाखाच्या वर गेली असून २२ नोव्हेंबर रोजी बँकेच्या फॉलोअर्सची संख्या १०,००,५१३ वर गेली. रिझर्व बँकेने जगातील सर्वात शक्तिशाली अमेरिकेची फेडरल बँक आणि युरोपीय केंद्रीय बँकांना मागे टाकत हे रेकॉर्ड नोंदविले आहे. विशेष म्हणजे अन्य केंद्रीय बँकांच्या तुलनेत रिझर्व बँकेने ट्विटर खाते उशिरा सुरु करूनही सर्वाधिक फॉलोअर्स मिळविले आहेत.

अमेरिकेच्या फेडरल केंद्रीय बँकेचे ट्विटर अकौंट मार्च २००९ मध्ये सुरु झाले आणि त्यांचे आजघडीला ६.६७ लाख फॉलोअर्स आहेत. युरोपियन केंद्रीय बँकेचे ट्विटर अकौंट ऑक्टोबर २००९ मध्ये सुरु झाले आणि त्यांचे आज घडीला ५.९१ लाख फॉलोअर्स आहेत. रिझर्व बँकेचे ट्विटर अकौंट जानेवारी २०१२ मध्ये सुरु झाले आहे.

रिझर्व बँक ८५ वर्षे जुनी आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बँकेने नोंदविलेल्या या विक्रमाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन त्यांच्या स्वतंत्र ट्विटर हँडल वरून केले आहे. या यादीत मेक्सिको केंद्रीय बँक ७.७४ ट्विटर फॉलोअर्स सह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तीन नंबरवर बँक ऑफ इंडोनिशिया ७.५७ लाख फॉलोअर्स सह आहे. विशेष म्हणजे जगातील ताकदवर बँकांच्या यादीत तीन नंबर वर असलेल्या बँक ऑफ जपानचे ट्विटरवर फक्त २८९०० फॉलोअर्स आहेत.