जगातील सर्वाधिक बुटका आणि सर्वाधिक उंच घोडा

फोटो साभार गिनीज बुक रेकॉर्ड्स

घोडा हे एक उमदे जनावर मानले जाते. अनेक जातीचे, अनेक रंगाचे घोडे प्राचीन काळापासून अनेक राजे राजवाडे आणि आता रेसिंग साठी पाळले गेले आहेत. घोड्यांची विशिष्ट लक्षणे पाहून त्यांच्या किंमती ठरविल्या जातात आणि रेस साठी ठराविक ब्रिडच्या घोड्यांना अधिक पसंती दिली जाते. घोड्याची सर्वसाधारण उंची ४ – ५ फुट असते.

पोलंड मध्ये जगातील सर्वात बुटबैंगन घोडा असून त्याचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदले गेले आहे. बॉम्बेल असे या घोड्याचे नाव असून त्याची उंची ५६.७ सेंटीमीटर म्हणजे १ फुट १० इंच आहे. पोलंडमध्ये राहणाऱ्या पॅट्रिक व केटरझायना यांच्या कास्कडा येथील फार्म हाउसवर बॉम्बेल राहतो. त्याचा मालक सांगतो, बॉम्बेलला आम्ही सर्वप्रथम पाहिले २०१४ साली. तेव्हा तो २ महिन्याचा होता पण नंतर आमच्या लक्षात आले की त्यांची उंची वाढत नाही. अर्थात या पूर्वी जगातील सर्वाधिक बुटक्या जिवंत घोड्याचे रेकॉर्ड थम्बलीना नावाच्या घोडीचे होते. तिची उंची होती ४४.५ सेंटीमीटर. तिचा मृत्यू २०१८ मध्ये झाला.

सर्वाधिक उंच घोड्याचे रेकॉर्ड बिग जेक यांच्या नावावर आहे. २०१२ मध्ये त्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली असून तो आता १७ वर्षांचा आहे. त्याची उंची आहे २१०.१८ सेंटीमीटर म्हणजे साधारण सात फुटापेक्षा थोडी जास्त. विस्कॉन्सिन मध्ये राहणाऱ्या जेरी गिल्बर्ट यांच्याकडे त्याची मालकी आहे. गिल्बर्ट हॉर्स ब्रीडिंगचा व्यवसाय करतात.