पहिलवान बबिता फोगटच्या घरी येणार छोटा पाहुणा

भारताची स्टार पहिलवान बबिता फोगटने सोशल मीडियावर पती विवेक सुहाग सह एक फोटो शेअर करून त्यांच्या घरी छोटा पाहुणा येत असल्याची बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोखाली बबिताने पतीसाठी एक सुंदर मेसेज लिहिला आहे. बबिता लिहिते,’ तुझ्या पत्नीच्या रुपात प्रत्येक क्षणी मी किती भाग्यवान आहे याची जाणीव मला झाली. तूच माझा आनंद, खुशी आहेस. तूच मला पूर्णत्व दिले आहेस. आता नवीन अध्याय सुरु होतोय, मी त्याची वाट पाहते आहे.’

३० वर्षीय बबिता आणि विवेक यांचा विवाह गतवर्षी डिसेंबर मध्ये झाला असून त्यावेळी त्यांनी सात ऐवजी आठ फेरे घेतल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती. हा आठवा फेरा त्यांनी मुलगी झाली तर तिच्या रक्षणासाठी घेतला होता. बबीताने अनेक आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळविली असून कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण, रजत पदकाची कमाई केली आहे. जागतिक चँपियन स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळविले आहे. गेल्या वर्षी तिने भाजप कडून विधानसभा निवडणूक लढविली होती पण तिला पराभव स्वीकारावा लागला होता. बबिता अर्जुन अॅवॉर्ड विजेती आहे.

द्रोणाचार्य अॅवॉर्डने सन्मान झालेले पहिलवान महावीर फोगट यांची मुलगी आणि गीता फोगटची बहिण बबिता यांच्या जीवनावर आलेला दंगल चित्रपटाने उत्पन्नाचे रेकॉर्ड केले होते.