कोविड लस वाहतुकीसाठी विमानतळ, वाहतूक कंपन्यांची तयारी

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

कोविड लस तयार होऊन तिचा पुरवठा सुरु झाला की त्वरित देशभरात तिचे वितरण सुरळीतपणे करता यावे यासाठी देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान भारत सरकार कोविड लस बनवीत असलेल्या प्रमुख कंपन्यांच्या संपर्कात आहे. पुढच्या वर्षाच्या सुरवातीपासून लसीकरण सुरु होईल असा अंदाज असून त्यासाठीची पूर्वतयारी वेगाने सुरु आहे.

मुंबईचा आंतरराष्ट्रीय छ. शिवाजी महाराज विमानतळ सर्वात मोठे फार्मा गेट मानले जाते कारण येथे प्रचंड प्रमाणावर औषधे येतात. हे लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने लस वाहतूक ऑपरेटर्ससाठी सुलभ टाईम स्लॉट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर या ऑपरेटर्सना उड्डाणाची तारीख आणि वेळ बदलण्याची संधी दिली जाणार आहे. येथे दिवसाचे २४ तास माल चढविणे, उतरविणे, एक्सरे मशीन, युनिट लोड उपकरणे सक्रीय राहणार आहेत.

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथून वर्षभरात सरासरी १५ लाख टन माल वाहतूक होते. येथे कोविड लस ठेवण्यासाठी उणे २० डिग्री तापमान असलेले चेंबर तयार केले गेले आहेत. भारतात कमी वेळात अधिकाधिक क्षेत्रात लस पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे त्यामुळे विशेष तयारी केली जात आहे.

ब्लू डार्ट या कुरिअर कंपनीची सहा ७५७ बोईंग जेट विमाने आहेत पण त्यांनी जरूर पडल्यास चार्टर विमाने घेण्याची तयारी केली आहे. मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, कोलकाता, दिल्ली, बंगलोर शहरात विशेष फार्मा कंडीशन स्टोररुम्स तयार केल्या गेल्या आहेत.