काही डॉलर्स मोजून मिळवा शेकडो चेहरे

फोटो साभार अमर उजाला

ऑनलाईन दुनिया आता व्हर्च्युअल माणसेही बनवू लागली आहे. चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान, आर्टिफीशीयल इंटेलिजन्स टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपन्या आता चेहरे बनवून त्यांची विक्री करू लागल्या आहेत. ‘धिस पर्सन डज नॉट एग्झिस्ट डॉट कॉम आणि जनरेटेड फोटो’ अश्या काही कंपन्यांनी यात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे हे फोटो अगदी सामान्य माणसांचे असले तरी ते फोटो प्रत्यक्ष कोणत्याही माणसाचे नाहीत.

व्हिडीओ गेम निर्मात्या वेबसाईट्स हे फोटो उपलब्ध असून त्यांच्या किमती ३ डॉलर्स पासून २ हजार डॉलर्स पर्यंत आहेत. म्हणजे अगदी २५० रुपयापासून ७५ हजार रुपयापर्यंत कुणालाही हे चेहरे विकत घेता येणार आहेत. भविष्यात या चेहऱ्यांनी भरलेले फोटो इंटरनेटवर प्रचंड संखेने दिसतील असे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर ऑनलाईन फोटोतील व्यक्ती खरी की खोटी हे सांगणे अवघड बनेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

२०१४ मध्ये प्रथम एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला पण तेव्हा खोटे किंवा बनावट चेहरे सहज ओळखता येत होते. पण आता हे तंत्रज्ञान खुपच प्रगत झाल्याने चेहरे ओळखणे अशक्य बनल्याचे समजते. फेस रेकग्निशनचा वापर फोन अनलॉक करणे, गुन्हेगार ओळख यासाठी उपयुक्त ठरला आहे. पण याचमुळे काही तोटे समोर येत आहेत. वाईट कामासाठी, दहशतवादी, इंटरनेटवर भडक मजकूर देणारे याचा गैरवापर करू शकतात आणि गुन्हेगार सोडून निरपराध माणसाला अटक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला जात आहे.