क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकच कर्णधार हवा: कपिल देव


मुंबई: क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारांसाठी वेगवेगळे कर्णधार असल्यास त्यामुळे चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता असून तिन्ही प्रकारात एकच कर्णधार असणे आवश्यक आहे, असे मत भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी केले.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली ‘मुंबई इंडियन्स’ने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. त्यानंतर भारतीय टी- २० संघाच्या कर्णधारपदी रोहितची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडू आणि क्रीडा समीक्षक यांचा या मागणीला पाठींबा आहे. मात्र, कपिल देव यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

एका कंपनीला दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असू शकत नाहीत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाला वेगवेगळ्या विचारांचे तीन वेगळे कर्णधार असणे अयोग्य ठरेल. वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे कर्णधार असतील तरीही संघातील ७० ते ८० खेळाडू तेच असणार आहेत. कसोटीत खेळताना एक दिवसीय संघाच्या कर्णधाराला खूश ठेवणे आणि एक दिवसीय संघात खेळताना कसोटी कर्णधाराची मर्जी राखणे अशी तारेवरची कसरत खेळाडूंना करावी लागेल. त्याचा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे कपिल देव यांचे म्हणणे आहे.

एकेकाळी फिरकी गोलंदाजीवर अवलंबून असलेला भारतीय संघ आता वेगवान गोलंदाजांच्या आधारे जिंकू शकत असल्याबद्दल कपिल देव यांनी समाधान व्यक्त केले. महम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीचे त्यांनी कौतुक केले. आपले गोलंदाज २० बळी घेण्यास सक्षम आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकेकाळी भारतीय संघात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यासारखे शैलीदार फिरकी गोलंदाज होते. आता त्यांची कमी शामी आणि बुमराहने भरून काढली आहे, असे ते म्हणाले. ‘आयपीएल’मध्ये वेगवान गोलंदाजांनी चेंडूच्या वेगापेक्षा ‘स्विंग’ महत्वाचा असल्याचे दाखवून दिले. मात्र, सामन्यातील पहिला चेंडू ‘क्रॉस सीम’ टाकण्याची प्रवृत्ती अयोग्य आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भरपूर यॉर्कर्सचा वापर करणारा टी नटराजन हा युवा गोलंदाज आपल्या दृष्टीने या स्पर्धेत ‘हिरो’ आहे, असेही ते म्हणाले.