4 जानेवारीपासून सुरू होणार नाशिकमधील शाळा


नाशिक: नाशिकमध्येही राज्यातील इतर शहरांप्रमाणेच तूर्तास शाळा सुरू होणार नाही. नाशिकमधील शाळा 4 जानेवारीपासून सुरू होणार असून उद्या सोमवारी जळगावमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडल्यानंतर भुजबळ यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्यच ठरेल, असे पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे येत्या 4 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून परिस्थिती पाहून 4 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. पण परिस्थितीनुसार निर्णय बदलण्यात येऊ शकतो, असे भुजबळ म्हणाले.

सर्व शिक्षकांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी टेस्ट करण्यात येणार असून शाळांना सॅनिटाइज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शहरात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन अथवा कर्फ्यू लागू करण्यात येणार नाही. तरी देखील नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्कशिवाय फिरू नये. हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी गोष्टींवर भर देण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्या सोमवारी जिल्ह्यातील शाळा सुरू करायच्या की नाहीत? याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सातशे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे, असे सांगतानाच उद्या शाळा सुरू होणार आहे. पण शाळा सुरू करण्याबाबतचे संभ्रमाचे वातावरण असल्यामुळे उद्याच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

उद्या कोल्हापुरातील शाळा सुरू होणार नाहीत. उद्यापासून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर नागपूरमध्येही उद्यापासून शाळा सुरू होणार नाहीत. येत्या 25 नोव्हेंबरपासून नागपूरमधील शाळा सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 23 आणि 24 तारखेला कोरोनाच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.