नौदलाच्या युद्धसरावातून अनोख्या सामंजस्याचे दर्शन: रिअर ऍडमिरल स्वामिनाथन


नवी दिल्ली: भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या नौदलांनी केलेल्या मलबार संयुक्त युद्धसरावात परस्पर सामंजस्याचे अनोख्या सामंजस्याचे दर्शन घडल्याचा निर्वाळा रिअर ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी दिला.

सागरात चीनच्या वाढत्या दादागिरीच्या पार्श्वभूमीवर चार देशांच्या नौदलांनी केलेल्या युद्धसरावाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या युद्धसरावाच्या आयोजनातील काटेकोरपणाबद्दल सहभागी देशांच्या नौदलांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले.

या युद्धसरावाची वैशिष्ट्य सांगताना रिअर ऍडमिरल स्वामिनाथन म्हणाले की, मलबार युद्धसराव २०२० मध्ये प्रथमच हा सराव दोन टप्प्यात घेण्यात आला. प्रथम बंगालच्या उपसागरात आणि नंतर अरबी सागरात हा सर्व करण्यात आला. या सरावात दीर्घकाळानंतर चारही देशांच्या नौदलांनी एकत्रित सहभाग घेतल्याने गणसंख्या पूर्ण झाली. या सरावात विविध देशांच्या नौदलांमधील विविध क्षेत्रातील सामंजस्याचे अनोखे दर्शन घडले. या ३ प्रमुख वैशिष्ट्यांसह अनेक बाबी या सरावातून सध्या झाल्या आहेत.

मलबार युद्धसराव २०२० पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. भारतीय नौदलाचे या सरावाच्या आयोजनातील कौशल्य, नियोजन, आणि नेतृत्वगुण कौतुकाला पात्र आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या नौदलाचे कमांडींग ऑफिसर अँथनी पिसांनी ट्विटरवर नमूद केले.

या युद्धसरावात सहभागी देशांच्या नौदलांनी एकत्रितपणे प्रभावीपणे ‘मिशन’ पूर्ण करण्याच्या क्षमतेचे दर्शन घडविले आहे भारतीय आणि अमेरिकन नौदलांनी जपान आणि ऑस्ट्रेलियन नौदलाच्या सहकार्याने पाणबुड्यांना लक्ष्य करण्याची क्षमता या सरावात सिद्ध केली आहे, असे अमेरिकन नौदलाच्या ‘निमिट्झ’चे कमांडर रिअर ऍडमिरल जेम्स ए क्रिक यांनी नमूद केले.