मसूद अझरचा भाऊ नरगोटा हल्ल्याचा सूत्रधार


नवी दिल्ली: जैश ए मोहोम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरचा भाऊ अब्दुल रौफ असगर हा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले चढविण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांचा सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले चढविण्याच्या उद्देशाने आलेले ४ दहशतवादी नरगोटा या ठिकाणी झालेल्या चकमकीत मारले गेले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या हल्ल्यांचे नियोजन असगर करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काझी तरार हा आणखी एक दहशतवादी म्होरक्या त्याला मदत करीत होता.

या हल्ल्याच्या नियोजनासाठी जैशच्या बहावलपूर येथील मुख्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत असगर, काझी यांच्यासह मौलाना अबु जुंदाल, मुफ्ती तौसिफ़ आणि आयएसआय या पाक गुप्तचर संघटनेचे अधिकारी उपस्थित होते. हल्ल्यांचे नियोजन पूर्ण झाल्यावर असगरने त्यासाठी भारतीय सीमेजवळच्या शकरघर येथील दहशतवादी तळावरील ४ दहशतवाद्यांची निवड केली. त्यांना या हल्ल्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षित दहशतवाद्यांनी सांबा विभागातून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यांनी जटवाल येथे एक ट्रक पकडून प्रवास सुरु केला. बन तपासणी नाक्यावर जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने ट्रक अडवताच चालक ट्रक सोडून पळून गेला. उतावीळ झालेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले.