रझा अकादमीचे राज्यपालांना राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करण्यासाठी पत्र


मुंबई – विरोधक आणि सर्वधर्मिय भाविकांकडून सातत्याने मागणी होत असल्यामुळे दिवाळी पाडव्याला राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली. राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्यात आल्यानंतर राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी रझा अकादमीने केली आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रझा अकादमीने पत्र दिले आहे. त्यावर आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

या संदर्भातील वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी भाष्य करण्यास राजभवनाने नकार दिला आहे. कोणतीही मशीद राजभवनामध्ये नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे. पण स्टाफ क्वार्टरमधील एक रुम मुस्लीम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावे म्हणून उघडी करून देण्यात आलेली होती. त्यामुळे बाहेरून येणारे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करायचे. त्यामुळे हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढायला लागली होती. बाहेरील लोक येथे शुक्रवारी नमाजासाठी यायचे. परंतु, कोरोनाच्या काळात गर्दी वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.

राज्यपालांना हे पत्र रझा अकादमीचे महासचिव एम. सईद नुरी यांनी लिहिले आहे. देशातील सर्व धार्मिकस्थळे खुली करण्यात आलेली असताना राजभवनातील कर्मचाऱ्यांना मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. नमाजसाठी केवळ पाच ते सात लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. आमची विनंती आहे की तात्काळ आदेश काढून कर्मचाऱ्यांना कोरोना पूर्वीप्रमाणेच नमाज पठण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असे राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.