स्वदेशी कोव्हॅक्सिनसंदर्भात भारत बायोटेकच्या प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती


भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या संकटामुळे चिंतीत आहे. आता भारतातही काहीशा घसरणीनंतर कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असल्यामुळे कोरोनाच्या संकटातून आपली लस आल्याशिवाय सुटका होणार नाही, असे वाटू लागले आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या लसीची वाट पाहिली जात आहे. भारतामध्ये सध्या भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरू असून यादरम्यान, या लसीबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती भारत बायोटेकच्या प्रमुखांनी सांगितली आहे.

भारत बायोटेकचे प्रमुख साई प्रसाद यांनी सांगितले की, भारताची कोव्हॅक्सिन पहिली लस आहे. जी लस किमान ६० टक्के प्रभावी असेल. त्यांनी सांगितले की, ५० टक्के प्रभावी लसीची अपेक्षा डब्ल्यूएचओ, यूएस एफडीए आणि भारताच्या सीडीएससीओ यांनी केली आहे. कोव्हॅक्सिनसाठी आम्ही ६० टक्के प्रभावी असल्याची अपेक्षा ठेवली आहे.

त्याचबरोबर या लसीवर तिसऱ्या टप्प्यामधील अपेक्षित परिणामांनंतर पुढील काम केले जाईल. ही लस उपलब्ध करण्यासाठी आम्ही विनियामक अनुमतीसाठी अर्ज करणार आहोत. तसेच चौथ्या टप्प्यातील चाचणीसुद्धा आम्ही सुरू ठेवणार आहोत. याशिवाय जर आम्ही परीक्षणाच्या आपल्या अंतिम टप्प्यात योग्य पुरावे आणि प्रभावी सुरक्षा डेटा मिळवण्यात यशस्वी ठरलो तर २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ही लस उपलब्ध करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

हल्लीच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल भारत बायोटेकने सुरू केली आहे. यामध्ये भारतातील २५ केंद्रावर २६ हजार स्वयंसेवकांवर चाचणी होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या भागीदारीमध्ये ही चाचणी होत आहे. पुढील वर्षापर्यंत या स्वयंसेवकांना देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि लसीच्या प्रभावाचे परीक्षण केले जाईल. आपल्या लसीची पहिली झलक हैदराबादस्थित भारत बायोटेकने दाखवली आहे. आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी बायोटेक आता आयोजित करत आहे.