कोरोनाचा प्रादुर्भाव 2021मध्ये देखील कायम राहिल्यास आगामी पिढीचे भविष्य धोक्यात


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव 2021मध्ये देखील कायम राहिल्यास आगामी पिढीचे भविष्य धोक्यात असल्याचा इशारा यूनिसेफने दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव 2020 प्रमाणेच पुढल्या वर्षीही कायम राहिल्यास याचे गंभीर परिणाम आगामी पिढीला भोगावे लागतील, असा धक्कादायक अहवाल यूनिसेफने दिला आहे. लहान मुलांसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करणाऱ्या या संघटनेचे असे म्हणणे आहे की, कोरोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे. कारण जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

एका पिढीसमोर असलेल्या तीन प्रकारच्या धोक्यांसदर्भातील माहिती 140 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी आणि असमानतेचा या धोक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

यासंदर्भात यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये जर वेळेत सुधारणा केली नाही तर जवळपास 20 लाख मुलांचा पुढील 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनिसेफने व्यक्त केला आहे.