मुंबई महानगरपालिकेवर बसवणार आरपीआयचा उपमहापौर : रामदास आठवले


मुंबई : भाजपकडून 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जय्यत तयारी केली जात आहे. ‘मिशन मुंबईचा’ नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा चंग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधला आहे. त्यानतंर आता मुंबई महानगरपालिकेवर रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर बसवण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेवर येत्या काळात जर महापौर भाजपचा असेल, तर उपमहापौर आरपीआयचा असेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. येत्या काळात जर भाजप स्वबळावर लढणार असली, तर आमचे भाजपला समर्थन असेल. शिवसेनेला महानगरपालिकेपासून भाजप आणि आरपीआय मिळून दूर ठेवू, असेही आठवले यावेळी म्हणाले. तसेच या पार्श्वभूमीवर मी लवकरच येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवून भाजपने निवडणुकीचे बिगूल फुंकले. महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. महानगरपालिका निवडणुकीसाठी बुथ स्तरापासून बांधणी करा. राजकारणाचा अभ्यास असलेल्या तरुणांकडे वॉर्डांची जबाबदारी सोपवा, अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या.

भाजपचाच आगामी निवडणुकीत विजय होईल. 2022 साली भाजपचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महानगरपालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही शिवसेनेचे नाव न घेता देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

भाजपचाच आगामी निवडणुकीत विजय होईल. महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ही भ्रष्टाचारी सत्ता आम्ही उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. आम्ही ठाकरे सरकारचा माज उतरवणार आहोत. जनतेच्या पैशांची लूट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असाही प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला होता.