आयुर्वेदिक डॉक्टरांना मिळणार शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण आणि परवानगी


नवी दिल्ली- आयुर्वेद चिकित्सेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण आणि परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी आयएमसीसी कायदा २०१६ मध्ये सुधारणा करून या संबंधीचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयावरून वैद्यकीय क्षेत्रात मोठे वादळ उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

आयुर्वेदाच्या शल्य चिकित्सा आणि शालाक्य चिकित्सा या विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शस्त्रक्रिया, कां, नाक, घसा, डोळे, दात, हाडे यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षित डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास कायदेशीर मान्यता असणार आहे.

या निर्णयात नवीन काही नसून मागील २५ वर्षांपासून आयुर्वेदिक संस्था आणि रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यावर कायदेशीर मोहोर उमटविण्यासाठी अयोग्य विभाग आणि नीती आयोगाशी चर्चा करून त्याला लिखित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे, असे ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’चे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांनी स्पष्ट केले.

मात्र, ऍलोपॅथीच्या डॉक्टरांचा या निर्णयास ठाम विरोध आहे. शस्त्रक्रिया हा निर्विवादपणे आधुनिक वैद्यकशास्त्राचा भाग आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत आयुर्वेदाशी जोडता येणार नाही. आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना MS (Ayurved) सारख्या पदव्या देणे हा रुग्णांच्या सुरक्षिततेशी खेळ ठरणार आहे, अशा शब्दात ‘असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. पी रघुराम यांनी या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे.