लव्ह जिहाद प्रकरणावरून असदुद्दीन ओवेसींनी भाजपला सुनावले


हैद्राबाद – सध्या लव्ह जिहादचा मुद्दा उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात ऐरणीवर आला आहे. लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कायदा करण्याची तयारी सुरू केली असून, त्यावरून टीका होऊ लागली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चर्चेत असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीवर भाजपकडून जोर दिला जात आहे. कायद्याची मागणी भाजपकडून होत असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी भाजपला सुनावले आहे. घटनेतील कलम १४ व २१चे विशेष विवाह कायदा रद्द केल्यास मोठे उल्लंघन होणार आहे. भाजपने घटनेचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नाटक करत असल्याचे म्हणत ओवेसी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी भाजपशासित काही राज्यांमध्ये कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपकडून महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. पण शिवसेनेसह काँग्रेसकडून या मागणीला विरोध होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना वाढल्याचा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केल्यानंतर राज्यात लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आला होता.