ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंह व तिच्या पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी


मुंबई : एनसीबी अधिकाऱ्यांनी ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांनीही आपण गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करत भारती आणि हर्षला येत्या 4 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्ष यांनी आम्ही गांजाचे सेवन केल्याचे एनसीबी समोर कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. आता या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पण या प्रकरणामुळे भारती हिच्या चाहत्यांना धक्का बसला असून त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तसेच भारतीच्या नावाची चर्चा सोशल मीडियात सुद्धा जोरदार सुरु झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत बहुतांश बॉलिवूड कलाकारांची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची नावे समोर आली आहेत. एनसीबी आता सातत्याने बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणी अधिक तपास करत असून यामध्ये काही नवी नावे सुद्धा समोर येत आहेत.