तिबेट निर्वासित सरकार प्रमुखांची प्रथमच व्हाईट हाउस भेट

फोटो साभार अमर उजाला

तिबेट निर्वासित सरकारचे प्रमुख, राष्ट्रपती डॉ. लोबसंग सांग्ये यांनी ६० वर्षात प्रथमच अमेरिकेच्या व्हाईट हाउसला अधिकृत भेट दिली असून असा दौरा करणारे ते पाहिले तिबेटी नेते ठरले आहेत. यामुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. सांग्ये यांच्या व्हाईट हाउस भेटीची माहिती वॉशिंग्टन मधील तिबेट कार्यालयाने जाहीर केली आहे.

डॉ. सांग्ये केंद्रीय तिबेटी प्रशासनाचे पाहिले अध्यक्ष असून त्यांना तिबेट संदर्भातील मुद्दे मांडण्यासाठी सहाय्यक विदेश मंत्री रोबर्ट डेस्ट्रो यांनी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. यापूर्वी अमेरिकन सरकारने तिबेट निर्वासित सरकारला मान्यता दिलेली नव्हती. त्यामुळे गेली ६० वर्षे सीटीए प्रमुखाना अमेरिकेत प्रवेश नव्हता.

नुकताच अमेरिकेच्या संसदेत सर्वसंमतीने तिबेट स्वायत्तता बद्दल प्रस्ताव मंजूर केला गेला असून १४ वे दलाई लामा यांच्याकडून केल्या गेलेल्या जागतिक शांतता, सौहार्द व ताळमेळ अशा महत्वाच्या कार्याला मान्यता दिली गेली आहे. डॉ. सांग्ये २०११ सालापासून या पदावर आहेत.

असे समजते की गेली दहा वर्षे अमेरिका अधिकारी डॉ. सांग्ये यांच्याशी गुप्त चर्चा करत आहेत. मात्र आता डॉ. सांग्ये याना थेट व्हाईट हाउस भेटीचे निमंत्रण देऊन आणि त्यांच्याशी तिबेट संदर्भात चर्चा करून अमेरिकेने चीनला चांगलाच धक्का दिला आहे. सीटीएचे मुख्यालय भारतात धर्मशाळा येथे आहे. चीन ने तिबेट वर हक्क सांगून १९५० मध्येच तिबेट कब्जात घेतले आहे आणि ते निर्वासित क्षेत्र जाहीर केले आहे.