चित्रकुट गाढव जत्रेत १ लाखाला विकला गेला शाहरुख

उत्तरप्रदेशातील चित्रकुट येथे दिवाळी निमित्त दरवर्षी मंदाकिनी काठी भरणाऱ्या जत्रेवर यंदा करोनाचा स्पष्ट प्रभाव पडलेला दिसून आला आहे. या दिवाळी जत्रेचे मुख्य आकर्षण असते गाढवांचा बाजार. देशभरातून येथे विविध जातींची गाढवे आणली जातात आणि त्यांच्या विक्री खरेदीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. या पौराणिक शहरात भरणाऱ्या या मेळ्यात फक्त गाढवे बघायला सुद्धा लोक गर्दी करतात. यंदा मात्र करोना मुळे साधारण ५ हजार गाढवे येथे आणली गेली. गेल्या वर्षी १२ हजाराहून अधिक गाढवे आणली गेली होती.

जात, लक्षणानुसार या गाढवांच्या किमती पाच हजारांपासून सुरु होतात आणि त्या लाखापर्यंत जातात. यंदा या जत्रेत २ हजार गाढवे विकली गेली. गेल्या वर्षी एका गाढवाला सव्वा लाख रुपयांची सर्वाधिक किंमत मिळाली होती. जत्रेत आणलेल्या गाढवांची नावे प्रसिद्ध कलाकार, राजकीय नेत्यांवरून ठेवली जातात. यंदा शाहरुख नावाच्या गाढवाला सर्वाधिक म्हणजे १ लाख रुपये किंमत मिळाली. हे गाढव दिपू जातीचे होते.

या जत्रेची सुरवात मोगल सम्राट औरंगजेबाने केल्याचे सांगितले जाते. दरवर्षी तीन दिवस ही जत्रा भरते.