गुगल, फेसबुक, ट्विटरने पाकिस्तान सोडण्याची दिली धमकी

फोटो साभार मिंट

गुगल, फेसबुक, ट्विटरसारख्या टेक कंपन्यांनी पाकिस्तानातून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. बुधवारी पंतप्रधान इम्रान खान यांनी इंटरनेट कंटेंट सेन्सॉरशिप संदर्भात नवा कायदा लागू केल्याची घोषणा करून नियम मोडणाऱ्या कंपन्यांना दंड ठोठावला जाईल असे जाहीर केले गेल्यावर प्रमुख टेक कंपन्यांनी त्याला विरोध केला आहे.

जागतिक इंटरनेट कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था एशिया इंटरनेट गठबंधनने सरकारने लागू केलेला कायदा चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गुगल, फेसबुक, ट्विटर या संस्थेचे सदस्य आहेत. हा कायदा लागू झाला तर या टेक कंपन्यांना पाकिस्तान मधील सेवा थांबवून बाहेर पडण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

पाकिस्तानी मिडिया नुसार माहिती तंत्रज्ञान संदर्भातल्या नव्या नियमानुसार सोशल मिडिया कंपन्या, इंटरनेट सेवा कंपन्यांना त्यांच्याकडील प्रत्येक माहिती, पाकिस्तानांतील तपास संस्थांकडून मागणी होताच त्यांना पुरवावी लागणार आहे. त्यात ग्राहक सूचना, ट्राफिक डेटा, युजर डेटा यांचाही समावेश आहे. इस्लाम अवहेलना मजकूर, दहशतवादाला प्रोत्साहन देणारा मजकूर, अभद्र भाषा, अश्लील साहित्य प्रसिद्ध केले गेले तर त्यासाठी ३.१४ दशलक्ष डॉलर्स दंड भरावा लागणार आहे.