केंद्र सरकार आणतेय कोविन अॅप

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

करोना लसीची प्रत्येकाला उत्कंठा लागलेली असतानाच ही लस सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार एक अॅप विकसित करत आहे. या अॅपचे नामकरण ‘कोविन अॅप’ असे केले आहे. या अॅप मुळे करोना संदर्भातील सर्व प्रकारची माहिती एकत्र साठविली जाणार आहे. त्यात करोना लस कुणाला दिली, लसीचे किती डोस खरेदी झाले, वितरण किती झाले आणि लसीचा किती साठा आहे अशी सर्व आवश्यक माहिती साठविली जाणार आहे. ज्याला लस दिली गेली त्याच्या आधारकार्डचा नंबर यात सेव केला जाईल. त्यामुळे हे अॅप लस घेण्याअगोदरच सर्व माहिती पुरवू शकणार आहे.

या अॅपवर वेळोवेळी डेटा अपलोड होईल त्यामुळे ताजी परिस्थिती समजण्यास मदत मिळेल. तसेच तळागाळात काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल. राज्यांनी केंद्राला डेटा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करायचे आहे. या अॅपच्या भागीदारीत आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय, आयुष्मान भारत या संस्था सामील आहेत.

हे अॅप लसीकरण झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र तयार करेल आणि ते डिजी लॉकर मध्ये ठेवता येईल. करोना लस आली की देशाची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल अशी आशा आहे. कारण लोक निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकणार आहेत. पण त्यासाठी लसीकरण संदर्भातील डेटा, त्याचे रेकॉर्ड आवश्यक आहे. कुणाला लस दिली गेली याचबरोबर साठा आणि वितरण यात पारदर्शीपण येणार असल्याने सर्वसामान्य जनतेपर्यंत लस सहज पोहोचणे शक्य होणार आहे असे सांगितले जात आहे.