कोरोनालस लवकरात लवकर उपलब्ध करता यावी, यासाठी फायझरने FDAकडे मागितली परवानगी


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा बिमोड करण्यासाठी अनेक देश दिवसरात्र मेहनत करुन कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचबरोबर जगभरातील अनेक देशांनी तयार केलेल्या लसी या चाचणीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. या सर्वांमध्ये अमेरिकेतील दिग्गज औषध उत्पादक फायझर (Pfizer) आणि त्यांची जर्मन सहकारी कंपनी बायोएनटेकने शुक्रवारी अमेरिकन प्रशासनाकडे, ही कोरोना प्रतिबंधक लस लवकरात लवकर उपलब्ध करता यावी, यासाठी परवानगी मागितली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र दिसत असताना फायझर संपूर्ण जगाला दिलासा दिला आहे.

संपूर्ण जगाच्या नजरा कोरोनापासून मुक्तीसाठी वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यासंदर्भात बोलताना म्हटले आहे, की आणीबाणीजन्य परिस्थितीतील वापराच्या मंजूरीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीवर विचार करण्यासाठी त्यांची व्हॅक्सीन कमिटी 10 डिसेंबरला भेट घेईल. संघटनेचे प्रमुख स्टेफेन हन म्हणाले, कोरोना लशीप्रति लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चा आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक असल्याचे एफडीएला वाटते.

स्टेफेन हन म्हणाले, अमेरिकन नागरिकांना मी विश्वास देतो, की एफडीएची प्रक्रिया आणि संभाव्य कोरोना लशीसाठीचे मूल्यांकन जेवढे शक्य असेल, तेवढे खुले आणि पारदर्शक केले जाईल. पण, समीक्षेसाठी किती वेळ लागेल याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. पण या लसीला डिसेंबरमध्ये हिरवा झेंडा दाखवला जाईल, असे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे. तत्पूर्वी, अखेरच्या विष्लेशनात ही लस 95% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तसेच एका दिवसाच्या आतच ते आवश्यक त्या परवानगी साठी अर्ज करतील, असे फायझरने म्हटले होते.