राज्यातील तब्बल 115 शिक्षक कोरोनाबाधित, असा आहे राज्यातील शिक्षकांचा कोरोना अहवाल


मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात राज्यातील तब्बल 115 शिक्षकांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शाळा सुरु होण्यापूर्वीच एवढे शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी शाळा सुरू होण्यापूर्वी अनिवार्य करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आणि संबंधित स्टाफ, कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. पण या चाचणीत अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर येत आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील 48 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे.

9 वी ते 12 पर्यंतच्या 491 शाळा उस्मानाबाद जिल्ह्यात असून 4 हजार 593 शिक्षक त्यात आहेत. त्यापैकी 3 हजार 786 शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 3 हजार 702 शिक्षक कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच बीड जिल्ह्यातील 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पहिल्या एक हजार चाचणीत 25 शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज उर्वरित शिक्षकांची कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील 8 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे आठही शिक्षक माध्यमिक वर्गातून शिकवणारे शिक्षक आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी ख़बरदारीचा उपाय म्हणून संबंधित शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

नांदेडमधील आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नांदेडमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 19 हजार 841 एवढी झाली आहे. तर कोल्हापुरातील 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 1393 शिक्षकांची काल कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत तब्बल 8 शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळला आहे. दरम्यान अजून जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्या सुरु आहे. त्यामुळे जर बधितांचा आकडा वाढला तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे.

राज्यातील इयत्ता नववी ते बारावी शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार काही शहरांमध्ये अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. कोविडच्या नियमांचे शाळा सुरू करताना पालन करावे लागणार आहे. सध्या नागपूर शहरातील शाळांमध्ये सॅनिटायझेशनचे काम वेगाने सुरू आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूंचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याशिवाय एकूण 11 हजार 500 शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.