आयफोन १२ प्रो मॅक्सच्या १४ युनिट सह डिलीव्हरी बॉयचा पोबारा

फोटो साभार ९१ मोबाईल्स

जगात सर्वाधिक क्रेझ असलेले आयफोन किमतीला महाग असले तरी त्यांना प्रचंड मागणी असते. आयफोनचे सर्वात पॉवरफुल मॉडेल अशी जाहिरात केलेला आयफोन प्रो मॅक्स त्याला अपवाद नाही. त्यामुळे या फोनचा मोह कुणालाही पडू शकेल. चीन मध्ये अॅपल स्टोर मध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तांग हा सुद्धा त्याला अपवाद ठरला नाही. या तांगने चक्क १४ आयफोन प्रो मॅक्स घेऊन पोबारा केला आणि त्यातून स्वतःच्या अनेक हौशी भागवून घेतल्या. अर्थात त्याबदली आता तो तुरुंगाची हवा खात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तांगकडे १४ नोव्हेंबर रोजी आलेल्या मागणीनुसार १४ आयफोन प्रो मॅक्स युनिट गुईयांग स्टोर मधून घेऊन दुसऱ्या अॅपल स्टोर मध्ये पोहोचविण्याचे काम होते. त्याने त्याच्या स्टोर मधून फोन घेतले पण दुसऱ्या स्टोर मध्ये ते नेऊन न देता फोनसह तो पळून गेला. त्यापूर्वी त्याने या स्टोर कडून आलेली ऑर्डर कॅन्सल करण्याची खबरदारी घेतली होती. त्याबद्दल त्याला फक्त ११३ रुपये दंड भरावा लागला होता. मग त्याने चोरलेल्या फोन पैकी एक स्वतः वापरला, एक मित्राकडून घेतलेले उसने पैसे फेडण्यासाठी त्याला दिला आणि आणखी एक फोन गहाण ठेऊन त्यातून मिळालेल्या १ लाख रुपयातून कपडे, बूट अश्या अनेक वस्तू खरेदी केल्या आणि एक बीएमडब्ल्यू कार भाड्याने घेऊन त्यातून फिरण्याची मौज लुटली. पण त्याची ही ऐयाशी जास्त काळ चालली नाही. पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. १४ पैकी १० आयफोन बॉक्स इनटॅक्ट मिळाले. या आयफोन्सची बाजारातील किंमत २० लाखहून अधिक होती असे समजते.